मुंबई (वृत्तसंस्था) आगामी विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाच्या जागा सर्वाधिक निवडून येतील, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. पण यावेळेस भाजपलाच जास्त जागा मिळतील आणि देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील,अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. उल्हासनगरमधील गोल मैदानात आठवले यांनी जाहिर सभा घेतली. त्यावेळेस ते बोलत होते.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपकडून जाहिररित्या अनेकदा युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पण होणारा मुख्यमंत्री भाजपचा की शिवसेनेचा? यावरून मात्र दोन्ही पक्षांमध्ये नेहमीच कुरघोडी होताना पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाच्या जागा सर्वाधिक निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. पण याचवेळेस भाजपलाच जास्त जागा मिळतील आणि देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील, ही रामदास आठवले यांची प्रतिक्रिया शिवसेनेला अस्वस्थ करणारी आहे.
यावेळी खा.आठवले यांनी शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळू शकते, असेही म्हटले. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील तोच अंतिम असेल, असेही विधान त्यांनी केले आहे. शिवाय, जागावाटपात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला यशस्वी होणार नाही, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.