नागपूर । काँग्रेस पक्ष हा वरकरणी कृषी विधेयकांचा विरोध करत असून त्यांना शेतकर्यांबाबत काडीमात्रही प्रेम नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
कृषी क्षेत्राशी संबंधित दोन विधेयकं काल राज्यसभेत मंजूर झाली. या विधेयकांना काँग्रेसकडून जोरदार विरोध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, काँग्रेसवर टीका केली आहे.कृषी संबंधित दोन विधेयके शेतकरीहिताची आहेत. यामुळे शेतीमध्ये गुंतवणूक येणार आहे. शेतकर्यांना आपलाच शेतमाल विकण्यासाठी आडत द्यावी लागत होती. आता आडत गेल्यामुळे बाजार शेतकर्यांच्या हातात येणार आहे. केंद्र सरकार हमीभाव बंद करणार नाही, असा दावा फडणवीस यांनी केला.
फडणवीस पुढे म्हणाले की, केंद्राच्या नव्या विधेयकामुळे शेतमालाची आंतरराज्य विक्री सोपी होणार आहे. शेतकरी आपला शेतमाल देशात कुठेही विकू शकतो, असे फडणवीस म्हणाले. काँग्रेस शेतकरीविरोधी असून त्यांना शेतकर्यांबद्दल काडीमात्र प्रेम नाही. कृषी विधेयकाला काँग्रेसचा बेगडी विरोध आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.