मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर या आपल्या निवासस्थानावर प्रदीर्घ बैठक घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळाचे कुतुहल चाळवले आहे.
आज दिवसभरात आरोप-प्रत्यारोपांचा खेळ चांगलाच रंगला. शिवसेना आणि शिंदे गटाने एकमेकांवर जोरदार हल्ले चढविले. सायंकाळी कॅबिनेट बैठक झाल्यामुळे उध्दव ठाकरे राजीनामा देणार की काय असे वातावरण निर्माण झाले. तथापि, असे झाले नाही. याचा अर्थ ते अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सहकार्यांसह रात्री साडेनऊच्या सुमारास राजभवनाला भेट दिली. त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशीष शेलार, प्रवीण दरेकर आदी नेत्यांची उपस्थिती होती. या भेटीचा तपशील अद्याप समोर आला नसला तरी राज्यपालांशी सत्ता स्थापनेबाबत चर्चा होणार असल्याचे समजते.