मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पोलीस बदली घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याने राज्य सरकारने आपल्या विरूध्द गोपनीयतेचा भंग करण्याच्या कारणावरून फिर्याद नोंदविली असून या प्रकरणी उद्या आपल्याला चौकशीसाठी सायबर पोलिसांसमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली आहे.
आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रारंभी त्यांनी मुंबई बॉंबस्फोटातील मृतांना आदरांजली व्यक्त करून या स्फोटातील आरोपींशी संबंध असणारे मंत्रीमंडळात असल्याचा टोला मारत याबाबत खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, गेल्या वर्षी मार्च महिन्यात आम्ही पत्रकार परिषद घेऊन पोलीस बदल्यांमधील घोटाळा उघड केला होता. याची चौकशी सीबीआय करत असून याच प्रकरणात अनिल देशमुख हे कारागृहात आहेत. या प्रकरणी गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल माझ्याविरोधात फिर्याद नोंदविण्यात आली. या संदर्भात काल मला पोलिसांनी नोटीस बजावली असून उद्या म्हणजे रविवारी बीकेसीच्या सायबर पोलीस स्थानकात चौकशीसाठी बोलावण्यात आले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. या चौकशीला आपण जाणार असून पोलिसांच्या चौकशीला उत्तर आपण देणार असल्याचे ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, आपण राज्याचे गृहमंत्रीदेखील होतो. यामुळे पोलिसांनी चुकीची केस नोंदविली असली तरी आपण त्यांना सहकार्य करू. आपण उद्या सकाळी अकरा वाजता आपण बीकेसीच्या सायबर पोलीस स्थानकात चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.