देवेंद्र भुजबळ प्रेरणा पुरस्काराने सन्मानित


अमळनेर (प्रतिनिधी) स्वतः च्या कामाची समाजासमोर प्रभावी ओळख निर्माण केल्याबद्दल आणि विविध क्षेत्रातील प्रसंशनीय जनसेवेबद्दल निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांना नुकतेच प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे येथील पत्रकार भवनात झालेल्या प्रेरणा साहित्य संमेलनात सम्मेलनाचे अध्यक्ष जगदगुरू महास्वामी श्री. श्री. श्री. डाँ.रंगनाथ नाथराव जोशी, सिद्धीमहायोगपीठाधिश्वर, महाशक्तीपीठ,तुळजापूर, इतिहास संशोधक,साहित्यिक भा. ल. ठानगे, सहायक पोलीस आयुक्त धनंजय धोपावकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्यिक डाँ. नंदकिशोर पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार श्री भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना जगदगुरू महास्वामी श्री. श्री. श्री. डाँ.रंगनाथ नाथराव जोशी यांनी आपल्या रसाळ वाणीने विश्व शांतीचे महत्व पटवून दिले. तसेच माणसामाणसातील परस्पर संबंध दृढ होण्याची गरज समजावून सांगितली. यावेळी विचारवन्त अजय महाजन, भारताच्या संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी श्री. महेश अयंनगार,गप्पागोष्टीकार जयंत ओक, निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भूपाल रावळ, चित्रकार प्रतिभा रावळ,सामाजिक कार्यकर्ते उदय घोरपडे, विविध मान्यवर, लेखक, कवी साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या भरगच्च सम्मेलनात काही पुस्तकांचे प्रकाशन, कवी सम्मेलन, व्याख्यानेही झाली.

 

देवेंद्र भुजबळ यांचा परिचय

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातून माहिती संचालक या पदावरून श्री देवेंद्र भुजबळ सेवानिवृत्त झाले आहेत. या महासंचालनालायत त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी, रायगड,उपसंचालक, कोकण ,नासिक विभागाचे माहिती उपसंचालक,मंत्रालयात वृत्त विभागाचे उपसंचालक म्हणूनही काम पाहिले आहे.  तत्पुर्वी त्यांनी मुंबई दूरदर्शन केंद्रात जवळपास सहा वर्षे कार्यक्रम निर्मिती केली आहे. दै. समाचार, अहमदनगर, दै. केसरी, पुणे,सा. सहयाद्री, पुणे या वृत्तपत्रांमध्ये ते काही काळ पत्रकार होते. आपलं दैनंदिन कामकाज संभाळुन श्री भुजबळ यांनी अनेक विषयांवर लेख लिहिलेले आहेत. विविध व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत.त्यांनी अनेक ठिकाणी अनेक विषयांवर व्याख्याने दिली आहेत आणि अजूनही देत असतात.

 

“भावलेली व्यक्तीमत्व”, “गगनभरारी”, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जाजवल्य पत्रकारिता” “करिअरच्या नव्या दिशा”” प्रेरणेचे प्रवासी” , ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.तर काही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या चौथ्या स्वातंत्र्यवीर सावरकर जागतिक साहित्य संमेलनात त्यांचे “स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जाजवल्य पत्रकारिता” या विषयावरील व्याख्यान विशेष गाजले होते. मलेशियात ११ ते १५ जानेवारी २०१९ दरम्यान झालेल्या चौथ्या शब्द मराठी विश्व साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते. त्यांच्या विचारप्रवर्तक उद्घाटनपर भाषणाची माध्यमांनी चांगली दखल घेतली. दूरदर्शनच्या “महाचर्चा” या लोकप्रिय कार्यक्रमाच्या २०० भागांसाठी,चार वर्षे संशोधक व समंव्ययक म्हणून तर आकाशवाणीवर दररोज सकाळी प्रसारित होणाऱ्या , माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या “दिलखुलास ” या कार्यक्रमाच्या पहिल्या ५०० भागांसाठी “टिमलिडर” म्हणून त्यांनी उत्तमपणे जबाबदारी पार पाडली आहे.

 

पुणे विद्यापीठाच्या बॅचलर ऑफ जर्नालिझम अँड कम्युनिकेशन या पदवी अभ्यासक्रमात ते “प्रा. ल.ना. गोखले ” पाठयवृत्तीचे सर्वप्रथम मानकरी ठरले होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या अभ्यासक्रमात ते प्रथम श्रेणीत सर्वप्रथम येऊन काही पदकांचे मानकरी* ठरले होते. एक उल्लेखनीय बाब म्हणजे आपल्या एवढ्या व्यस्त कामकाजात देखील त्यांनी आपली समाजकार्याची आवड जोपासली आहे. एखाद्या सेवाभावी संस्थेला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न असो अथवा समाजातील विविध , वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींची समाजाला ओळख करून देणे असो, असे सगळे कार्य ते उत्साहाने करतात. भुजबळ यांना अनेक राज्य, राष्ट्रीय पुरस्कारानी गौरविण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content