
यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल नगर परिषद कार्यक्षेत्रातील विस्तारित वसाहतींमधील पायाभूत सुविधांच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करत, शहरातील तिरुपती नगर आणि फालकनगर परिसरातील रस्ते डांबरीकरणाच्या कामांचे मोठ्या उत्साहात भूमिपूजन करण्यात आले. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या रस्ते कामांमुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती
या विकासकामांचे भूमिपूजन लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई पाटील यांच्या हस्ते पार पडले. विशेष म्हणजे, शहराच्या विकासासाठी या कार्यक्रमात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकाच व्यासपीठावर उपस्थिती लावून सकारात्मक संदेश दिला. यामध्ये , नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, नगर परिषद ‘उबाठा’ गटाचे गटनेते सागर चौधरी, तसेच शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती पराग सराफ यांचा सहभाग होता.
विकासाच्या प्रवाहात विस्तारित वसाहती
कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्षांनी सांगितले की, शहराच्या विस्तारित भागाचा विकास करणे हे नगर परिषदेचे मुख्य ध्येय आहे. तिरुपती नगर आणि फालकनगर या भागातील रहिवाशांना खराब रस्त्यामुळे होणारा त्रास आता कायमचा दूर होणार आहे. या कामासाठी दर्जेदार साहित्य वापरण्याच्या सूचनाही यावेळी कंत्राटदारांना देण्यात आल्या.
याप्रसंगी नगरसेविका वैशाली बारी, निसार मोमीन, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष हकीम शेख याकूब यांसह परिसरातील नागरिक आणि नगर परिषदेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्ते डांबरीकरणाच्या या निर्णयाचे व कामाच्या सुरुवातीचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून, यामुळे परिसराच्या वैभवात भर पडणार आहे.



