Home Cities जळगाव विवेकानंद नगरात ‘देव होळी’चा जल्लोष ; फुलांची उधळण आणि छप्पन भोग अर्पण

विवेकानंद नगरात ‘देव होळी’चा जल्लोष ; फुलांची उधळण आणि छप्पन भोग अर्पण


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात होळीच्या उत्सवाची चाहूल लागताच विविध भागांत धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असून विवेकानंद नगरातील नर्मदेश्वर महादेव मंदिरात रंगलेली ‘राधा-कृष्ण देव होळी’ विशेष आकर्षण ठरली. रोटरी क्लब ऑफ जळगाव रॉयल यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्याने भक्ती, संस्कृती आणि उत्साह यांचा सुंदर संगम घडवून आणला.

विवेकानंद नगर येथील नर्मदेश्वर महादेव मंदिर परिसरात सायंकाळपासूनच भाविकांची गर्दी उसळली होती. आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि राधा-कृष्णाची नयनरम्य आरास यामुळे मंदिर परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला. देवाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी छप्पन भोग अर्पण करण्यात आला. फुलांच्या पाकळ्यांनी खेळली जाणारी ‘देव होळी’ हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. रंगांऐवजी फुलांची उधळण करत साजरी करण्यात आलेली ही होळी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी उपस्थिती दर्शवली.

कार्यक्रमात श्री सत्संग भजन मंडळ यांनी सादर केलेल्या सुमधुर भजनांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. राधा-कृष्णाच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात वातावरण अधिकच भारावून गेले. भजनांच्या तालावर अनेक भाविकांनी भक्तीभावाने सहभाग घेतला. विवेकानंद नगर परिसरातील अमर मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले.

या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ जळगाव रॉयलचे अध्यक्ष जितू भोजवानी, सचिव गणेश वर्मा तसेच प्रमुख पदाधिकारी नारायण लाहोरी, भावेश शहा, वनिता वर्मा, कविता लाहोरी आणि वंचिका भोजवानी यांनी परिश्रम घेतले. नियोजनबद्ध आयोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि भक्तीमय सादरीकरणामुळे कार्यक्रमाला वेगळीच उंची प्राप्त झाली. अबालवृद्ध, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मंगल सोहळ्याचा आनंद लुटत होते.

दरम्यान, अमळनेर बाजार समितीत विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बाजार समितीच्या आवारात १३६ दुकान गाळ्यांचे बांधकाम पूर्णत्वाकडे जात असून नवीन लेखापाल कार्यालय उभारण्यात आले आहे. पातोंडा उपबाजारात वे-ब्रिजची सुविधा सुरू करण्यात आली आहे. बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून मारवड उपबाजार समितीत संरक्षक भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या सर्व विकासकामांचे लवकरच उद्घाटन होणार आहे.

तसेच शेतकरी भवन, हमाल-मापाडी भवन आणि व्यापाऱ्यांसाठी सुसज्ज २०० फूट शेडचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. लिलावासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यात मोफत थंड पेय तर हिवाळा आणि पावसाळ्यात मोफत चहाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्नदात्या शेतकऱ्यांचा वार्षिक सभेत यथोचित सन्मान करण्यात येणार असल्याचे सभापती अशोक पाटील यांनी सांगितले.


Protected Content

Play sound