जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडले असतांना देखील कारवाई न करता ते सोडून दिल्याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे व पोहेकॉ किरण शिंपी यांच्यावर कार्यालयीन कारवाई सुरु करण्यात आली आहे.
सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, पहूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून ते वाहन पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे व पोहेकॉ अमोल शिंपी यांनी सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी रात्री पकडले होते. या वाहनावर कारवाई न करता ते सोडून देण्यात आले. या विषयीचा अहवाल पहूर पोलिस ठाण्याकडून पोलिस अधीक्षक कार्यालयाला सादर करण्यात आला. त्यावर कार्यालयीन कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे या दोघांवर कारवाईची टांगती तलवार अटळ आहे. या प्रकरणाची उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्याकडे चौकशी देण्यात आली आहे.
भडगाव पोलिस ठाण्यातच वाढदिवस साजरा करीत तेथे केक कापण्यात आला. त्याचा व्हिडिओ व्हायरल होऊन त्यात जुगाराच्या गुन्ह्यातील आरोपी तसेच पोलिस कर्मचारी विलास पाटील व स्वप्नील पाटील हेदेखील दिसत असल्याने त्यांना गेल्या आठवड्यात पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी निलंबित केले. त्यानंतर त्यांना मंगळवार, १७ ऑक्टोबर रोजी आपली वेतनवाढ का रोखण्यात येऊ नये?, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या दोघांवर अजून कठोर कारवाई होण्याचे संकेत पोलिस सूत्रांनी दिले आहे.