उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली अल्पसंख्याक विभागाची बैठक

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अजित पवार गटाने आता विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याक मते मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील अल्पसंख्याक विभागाची बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात पक्ष कार्यालयात ही बैठक तब्बल दोन तास सुरू होती. या बैठकीत अल्पसंख्याक समाजाचा गमावलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल, याबाबतच्या मुद्यांवर मंथन झाले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचा पराभव झाल्यानंतर भाजपने आपल्या आक्रमक हिंदुत्ववादी अजेंड्याची लाईन कायम ठेवली असली तरी आता अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने या पराभवातून धडा घेतल्याचे दिसत आहे.

या बैठकीत अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांनी आपली मते ठामपणे मांडली. महायुतीमध्ये मुस्लिम समाजाला दुजाभावाची वागणूक मिळत आहे. महायुतीच्या मित्रपक्षांमधील नेते सातत्याने मुस्लिम समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करत आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत घटक पक्ष असलेल्या टीडीपी पक्षाने आंध्र प्रदेश सरकारने मुस्लिम समाजाला चार टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे राज्यात देखील मुस्लिम समाजाला शिक्षणात ५ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे आणि त्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा निकाल आहे, ही भूमिका अल्पसंख्याक नेत्यांनी मांडली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी राज्य सरकारकडे मुस्लिम आरक्षणाचा प्रस्ताव मांडावा, अशी मागणीही या नेत्यांनी केली आहे.

Protected Content