वंचित कर्जदार सभासदांच्या याद्या तीन दिवसांत जमा करा : आ. किशोर पाटील

ed0aa0d5 dc2d 414a bf68 d2a0331d1241

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील वि.का.स. सोसायट्यांचे बरेच कर्जदार शेतकरी सभासद कर्जमाफी योजनेपासून वंचित असल्याच्या तक्रारी येथील आमदार किशोर पाटील यांच्याकडे आल्याने त्यांनी काल (दि.८) प्रांत कार्यालयात तहसीलदार, सहाय्यक निबंधक, जे.डी.सी.सी. बँकेचे अधिकारी व वि.का.स. संस्थेचे सचिव यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती.त्यावेळी आ. पाटील यांनी तालुक्यातील एकही कर्जदार शेतकरी या माफी योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक वि.का.स. सोसायटी सचिवांनी तीन दिवसांच्या आत वंचित सभासदांची यादी सहाय्यक निबंधक कार्यालयात जमा करावी असे आदेश दिले आहेत.

 

या बैठकीत पाचोरा तालुक्यातील वि. का. सं. संस्थेचे साधारणपणे ४५ हजार कर्जदार सभासदास असून कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ २३९७४ कर्जदार सभासदांना ५८ कोटी रुपये लाभ मिळाला आहे. त्यात कर्जमाफी ११०३८ सभासदांना प्रोत्साहनपर कर्जमाफी, १२३७१ सभासदांना तर ओ.टी.एस. योजनेअंतर्गत ६०५ सभासदांना अशा एकूण २३९७४ सभासदांना कर्जमाफी मिळाल्याचे सहाय्यक निबंधक यांनी सांगितले. उर्वरित कर्जदार सभासदांपैकी काही मयत कर्जदार सभासदांच्या वारसांनी अर्ज केला नाही. प्रोत्साहन कर्जदार सभासदांनी अर्ज केला नाही तर बऱ्याच कर्जदार सभासदांचा ऑनलाईन अर्ज भरताना त्यांचा अंगठ्याचा ठसा येत नव्हता, त्यामुळे ऑनलाईन अर्ज करूनही यादीत त्यांचे नाव समाविष्ट झाले नाही. या व अशा बऱ्याच तक्रारी सचिव व सहकार विभागाकडून प्राप्त झाल्या आहेत. यावर चर्चा, विचार विनिमय करून प्रत्येक वि.का.सह सोसायटी सचिवांनी तीन दिवसाचे आत वंचित सभासदांची यादी सहाय्य्क निबंधक कार्यालयात जमा करावी, असे आदेश आमदार किशोर पाटील यांनी दिले आहेत. या याद्या प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री व सहकारमंत्री यांचेकडे आपण याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आमदारांनी यावेळी नमूद केले. कोणताही शेतकरी कर्जदार सभासद कर्जमाफीपासून वंचित राहता कामा नये, असे शासनाचे धोरण असल्याने सचिवांनी माहिती सादर करावी, असे आ.पाटील यावेळी म्हणाले. बैठकीला दिनकर देवरे, उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, अंबादास सोमवंशी, स्वीय सहायक राजेश पाटील, नाना वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

Protected Content