जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हद्दपारीचे आदेश असताना देखील जळगाव शहरात फिरत असलेल्या अट्टल गुन्हेगाराला लोखंडी तलवारासह जळगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अंकुश मधुकर सुरवाडे वय-१९, रा. गेंदालाल मिल, जळगाव असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंकुश सुरवाडे याला जळगाव शहरातून जिल्हाधिकारी यांनी हद्दपारचे आदेश काढलेले आहेत, असे असताना देखील तो जळगाव शहरातून लोखंडी तलवार घेऊन परिसरात दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती जळगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या शुक्रवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता कारवाई करत अट्टल गुन्हेगार अंकुश मधुकर सुरवाडे वय १९, रा. गेंदालाल मिल, जळगाव याला अटक केली. त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत केली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांचाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल किशोर निकुंभ हे करीत आहे.