जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या गुन्हेगाराला शनीपेठ पोलीसांनी कारवाई करत शंकरराव नगरातील राहत्या घरातून अटक केल्याची कारवाई शुक्रवारी १३ डिसेंबर रोजी मध्यरात्री सव्वा दोन वाजता केली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशांत प्रताप चौधरी (वय २०, रा. डीएनसी कॉलेज परिसर, शंकरराव नगर, जळगाव) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शंकरराव नगरात राहणारा गुन्हेगार निशांत प्रताप चौधरी याच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने जिल्हा पोलीस अधिकांच्या आदेशानुसार त्यांच्यावर दोन वर्षांसाठी जिल्हा हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार असतांना देखील गुन्हेगार निशांत चौधरी हा जळगावातील राहत्या घरी असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस कॉन्स्टेबल गिरीश पाटील आणि पोलीस शिपाई विकी इंगळे यांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी कारवाई करत शुक्रवारी १३ डिसेंबर रोजी मध्यरात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास गुन्हेगार निशांत चौधरी याला राहत्या घरातून अटक केली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय खैरे हे करीत आहे.