जळगाव प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत आज पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सकाळपासून सुरु होत्या. जळगाव ग्रामीणच्या मुलाखती सुरु झाल्यावर पक्षविरोधी काम करणारेच उमेदवारी मागताय म्हणून देवकर समर्थकांनी निरीक्षकांच्या लक्षात आणून दिले. यावरून देवकर समर्थक आणि संजय पवार, ज्ञानेश्वर महाजन यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. दरम्यान, सकाळी कार्यक्रमाला हजर असणारे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सायंकाळी मुलाखात देण्याचे टाळल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत आज पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सकाळपासून सुरुवात झाली होती. सायंकाळी जळगाव ग्रामीणमधील इच्छुकांच्या मुलाखती सुरु झाल्यात. यावेळी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून कल्पिता रमेश पाटील,अरविंद भिमराव मानकरी,जितेंद्र बाबुराव देशमुख,कल्पना गरिबदास आहिरे, ज्ञानेश्वर भादू महाजन, पुष्पा ज्ञानेश्वर महाजन, संदिप विजय पवार व संजय मुरलीधर पवार यांनी उमेदवारी मागितली. परंतू देवकर समर्थक राष्ट्रवादीचे जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी व धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी यांनी संजय पवार व ज्ञानेश्वर महाजन यांच्यावर लोकसभेत आणि मागील विधानसभेत पक्षविरोधी काम केल्याचे आरोप केलेत. यावरून जोरदार खडाजंगी सुरु झाली. यावेळी एन.डी.पाटील,संभाजी धनगर व नारायण चौधरी,अरविंद देवरे यांनी देखील देवकर यांना कसा त्रास दिला जातोय, ते सांगितले. यावर दिलीप वळसे पाटील यांनी दोघं गटाला शांत राहण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर सर्वाना बाहेर जाण्यास सांगितले.
यावेळी माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी धरणगावचे माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे यांना थांबायला सांगत, श्री.वळसे पाटील यांना सांगितले की, याप्रकरणात आपल्याला वाघमारे यांचे म्हणणे ऐकून घ्यावं लागेल. त्यांना स्वतंत्र वेळ द्यावा लागेल. त्यानुसार श्री. वाघमारे हे सर्व देवकर समर्थकांना बाहेर घेवून गेलेत. थोड्या वेळाने बोलावणे झाल्यावर त्यांनी जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी व धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी यांच्यासोबत वळसे-पाटील व अरुणभाई गुजराथी यांनी सर्वांसोबत बंदद्वार चर्चा केली. या चर्चेत नेमके काय बोलणे झाले ते कळू शकले नाही. मात्र, विरोधी गटाबद्द्दल अनेक गंभीर गोष्टींचा खुलासा केल्याचे कळते.
दुसरीकडे कल्पिता रमेश पाटील,अरविंद भिमराव मानकरी,जितेंद्र बाबुराव देशमुख,कल्पना गरिबदास आहिरे, ज्ञानेश्वर भादू महाजन, पुष्पा ज्ञानेश्वर महाजन, संदिप विजय पवार व संजय मुरलीधर पवार या सर्वांनी आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी देण्याची भूमिका पक्ष निरीक्षकांजवळ मांडल्याचे कळते.