नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कर्नाटकात लोकशाही अन् प्रामाणिकपणा पराभूत झालीय,अशा शब्दात कर्नाटकातल्या राजकीय नाट्यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले आहे.
कर्नाटकमध्ये महिन्याभरापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस व जनता दल (सेक्युलर) यांच्या अनेक आमदारांनी तीन आठवड्यांपूर्वी पदाचे राजीनामे देणे सुरू केले होते, तेव्हाच कुमारस्वामी सरकारचे दिवस भरत आले, हे स्पष्ट झाले होते. सरकार कधी पडणार, एवढाच मुद्दा होता. शेवटी काल सरकार कोसळले. यावर राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. कर्नाटकात लालसा विजयी झाली असून, लोकशाही अन् प्रामाणिकपणा पराभूत झाल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे प्रियंका गांधींनीही भाजपावर हल्लाबोल केला आहे. सगळेच खरेदी करता येत नाही. प्रत्येकाची बोली लावली जात नाही. खोट्या गोष्टी एक ना एक दिवस उघड्या पडतात हे भाजपाच्या लवकरच लक्षात येईल, असे प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत.