मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती पाहता एकूण 6800 कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार तसेच नौदल, वायू दल, एनडीआरएफ या सर्वांचे आभार मानले. जेवढी मदत मागितली तेवढी उपलब्ध करून देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कोल्हापूर-सांगली आठ दिवसांपेक्षा जास्त पूराने थैमान घातले होते. आता हळूहळू दोन्ही शहरातील तसेच आसपासच्या परिसरातील पूर ओसरून परिस्थिती सुधारत आहे. या महापूरात ज्यांची घरे पडली, वाहून गेली सरकार त्यंना घर बांधून देणार आहे. तसेच सांगली-कोल्हापूर पूरग्रस्त भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 576 कोटींची तरतूद करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पुरामुळे झालेल्या एकंदर हानीचा अंदाज घेऊन केंद्राकडे ६८०० कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यापैकी ४,७०० कोटी रुपये कोल्हापूर, सांगली व साताऱ्यासाठी तर, उर्वरीत २१०५ कोकण, नाशिक व इतर जिल्ह्यांना दिले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून ही मदत मिळेल, असा विश्वास आम्हाला आहे. मात्र, त्यासाठी वेळ लागणार आहे. तोपर्यंत राज्याच्या आपत्ती निवारण निधीतून भरपाई दिली जाईल. पडझड झालेली घरे पूर्ण बांधून देण्यात येतील, असेही फडणवीस यांनी सांगितले. मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिला.