Home क्राईम पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी 

पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी 


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पतसंस्थांमध्ये ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी आणि पतसंस्था चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेना (शिंदे गट) चे रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हा उपसंघटक नितीन श्रावण सोनार यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

यावल तालुक्यातील सहाय्यक निबंधक कार्यालयाबाबत मोठ्या प्रमाणावर ठेवीदारांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सोनार यांनी जळगावच्या निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांना निवेदन सादर केले. या निवेदनात तत्कालीन सहाय्यक निबंधक अच्युत नगरे यांनी आपल्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करून पळ काढल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावर कायमस्वरूपी निलंबन करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सोनार यांनी आपल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले की, अशा प्रकारच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची खातेनिहाय सखोल चौकशी करण्यात यावी आणि आर्थिक गैरव्यवहार उघड झाल्यास तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत. त्यांनी या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नसून, पतसंस्था चालकांसोबत संगनमत करून ठेवीदारांच्या पैशांची लूट करण्यास मदत केल्याचा आरोप केला आहे.

सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवून नागरिकांनी आपल्या कष्टाची कमाई पतसंस्थांमध्ये ठेवली होती. मात्र, शासनाने नेमलेले अधिकारीच या पैशांच्या सुरक्षेत अपयशी ठरले आणि ठेवीदारांचा विश्वासघात झाला, असे सोनार यांनी नमूद केले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनाही तितकेच जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

यासोबतच, ठेवीदारांनीही पुढाकार घेऊन आपल्या ठेवी सुरक्षित करण्यासाठी कायदेशीर पावले उचलावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. पतसंस्थांच्या चेअरमन आणि संचालकांच्या मालमत्तांवर ठेवींचा बोजा नोंदवून ठेवावा, जेणेकरून संबंधित व्यक्ती मालमत्ता विक्री करताना ठेवीदारांचे पैसे परत देण्यास भाग पाडले जातील, अशी सूचना सोनार यांनी केली आहे.

या प्रकरणात सहकार विभागातील संबंधित अधिकारी, आयुक्त आणि इतर जबाबदार व्यक्तींविरोधातही पुराव्यानिशी तक्रारी दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ठेवीदारांच्या पैशांशी खेळ करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.


Protected Content

Play sound