चाळीसगाव प्रतिनिधी । एस. टी. महामंडळाने तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्डच्या पैशांची सक्ती करु नये व ज्येष्ठ नागरीकांसाठी स्वतंत्र खिडकीची व्यवस्था करावी अशी मागणी रयत सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आले असून यावर कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भात वृत्त असे की, रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापक संदिप निकम यांना दिलेल्या निवेदनात दिले आहे. यात म्हटले आहे की चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवास सुकर व स्वस्तात व्हावा यासाठी एस. टी. प्रशासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना चालु वर्षी स्मार्ट कार्ट देण्यात येणार आहे. मात्र स्मार्ट कार्डाचे एक महिन्याचे व जुन महिन्याचे पैसे असे एकूण दोन महिन्यांच्या पासचे पैसे आपल्या कार्यालयाकडुन सक्तीने वसुल करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील वर्षी दुष्काळ असल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले व जुन महीना हा शेती पेरणीचा हंगाम असतो यात शेतकर्यांना शेतीसाठी पैसे लागतात. अनेक विद्यार्थी हे शेतकर्यांची मुले असल्याने त्यांना दोन महिन्यांच्या पासचे पैसे भरणे शक्य नाही म्हणुन एस. टी. प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून एकच महिन्याचे पैसे घेऊन त्यांना पास देण्यात यावा. तसेच ज्येष्ठ नागरीकांना पास देण्यासाठी चाळीसगाव बस स्टँडला त्यांच्या अंगठ्यांचे ठसे घेतले जात आहेत. यासाठी तालुक्यातील १४४ खेड्यातुन ज्येष्ठ नागरीकांना अंगठ्याचे ठसे द्यायला यावे लागते. मात्र बस स्टँडला नेहमी सर्व्हर जाम असल्याने व एकच खिडकी असल्यामुळे फक्त १० च्या जवळपास लोकांचे काम होते व इतरांना काम न होताच परतावे लागते. म्हणुन प्रशासनाने किमान दोन खिडक्या सुरु कराव्यात. त्यांना आसनाची व पाण्याची व्यवस्था करावी. तसेच तालुक्यातील गाव निहाय आठवड्याला ठराविक दिवशी वार देण्यात यावे त्यामुळे त्यांचे हाल होणार नाही.
या मागण्यांवर अंमलबजावणी न झाल्यास रयत सेनेच्या वतीने आंदोलन करुन संगणकाची वाजत गाजत एस टी स्टँड परीसरात मिरवणूक काढण्यात येईल. यासाठी कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाल्यास एस टी प्रशासन व आगार प्रमुख जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे.
याप्रसंगी रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश समन्वयक पी. एन. पाटील. व्यापारी सेनेचे अध्यक्ष विकास बागड, विद्यार्थी सेनेचे पंकज पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, समन्वयक रोहन पाटील, आडगाव शाखा अध्यक्ष राजेंद्र पाटील, विद्यार्थी मनीष पवार, हर्षवर्धन पवार, सागर चौधरी, दर्शन पवार, मोहन खैरनार. कुलदीप पाटील, दुर्गेश पाटील, निलेश चव्हाण, योगेश पाटील, सुरज महाजन, कैलास भामरे, विकास खैरनार, उद्धव कदम, शुभम पाटील, विक्की माने, ओम देशमुख, रोहित झगडे, भुवनेश्वर रोकडे, भरत सूर्यवंशी, गौरव मगर, अक्षय भोई, वैभव मगर, गौरव मगर, निलेश सोनवणे यांच्यासह कळवाडी, पिलखोड, देवळी, आडगाव, पळासरे, वाघडू, पातोंडे व साकुर येथील विद्यार्थी उपस्थित होते.