१०० कोटी द्या. . .मंत्रीपद घ्या ! : चौघांना अटक

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे राज्यातील सत्तांतर प्रत्येक आमदाराला ५० कोटी मिळाल्याची चर्चा रंगली असतांनाच मंत्रीपदासाठी तब्बल १०० कोटी रूपयांचे आमीष दाखविणार्‍या टोळीला गजाआड करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे यात तीन आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्रीपदासाठी १०० कोटी रूपयांचे आमीष दाखविल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आल्याचे वृत्त एबीपी-माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्तानुसार, मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवून देण्याच्या नावाखाली आरोपींनी आधी आमदारांना फोन करून आपण दिल्लीहून आल्याचे सांगितले. तसेच मोठ्या मंत्र्यांनी त्यांचा बायोडेटा विचारला आहे, असेही सांगितले. यानंतर संबंधित आरोपींनी आमदारांशी दोन ते तीन वेळा फोनवर बोलून सांगितले की, मंत्रिमंडळात मंत्रिपद हवे असेल तर १०० कोटी रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. यानंतर १७ जुलै रोजी आरोपींनी आमदारांची ओबेरॉय हॉटेलमध्ये भेट घेतली.

दरम्यान, या सर्व प्रकाराची माहिती मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाला देण्यात आली. या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून एका आरोपीला पकडले आणि त्याच्या चौकशीत आणखी ३ आरोपींची नावे समोर आली. यात रियाज अल्लाबक्ष शेख, योगेश मधुकर कुलकर्णी, सागर विकास संगवई, आणि जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी यांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात एका आमदाराच्या पीएने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Protected Content