पहूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्र. 753F वर, पहूर (ता. जामनेर) येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ. हेडगेवार प्राथमिक आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाजवळ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. महामार्गावरून भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांमुळे रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत असून, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालक-शिक्षक संघाने केली आहे.

याच पार्श्वभूमीवर पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शंकर भामेरे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन सादर केले. या निवेदनात शाळेजवळ झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल यंत्रणा, सूचना फलक आणि गतिरोधक बसविण्याची विनंती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची शाळा राष्ट्रीय महामार्गालगत असल्यामुळे वाहतुकीचा वेग अत्यंत धोकादायक पातळीवर आहे, आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या समस्येची गांभीर्याने दखल घेत ग्रामपंचायत स्तरावरही हालचाली सुरू झाल्या आहेत. पहूर कसबे ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच आशाताई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत माजी सरपंच लक्ष्मण गोरे यांच्या सूचनेनुसार, शाळेजवळ सुरक्षेच्या उपाययोजनांचा एकमुखी ठराव करण्यात आला. पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी यास एकमुखी पाठिंबा दिला.
विशेष म्हणजे, संबंधित महामार्गावरील शाळेजवळ ताशी 65 किमी वेग मर्यादेचा अधिकृत फलक लावलेला असून, तो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्यक्षात धोकादायक ठरत आहे. शाळा परिसरात वाहनांचा वेग अत्यंत मर्यादित असणे गरजेचे असताना, वेगवेगळ्या प्रकारची अवजड वाहने या मार्गावरून मोठ्या संख्येने धावत असल्यामुळे अपघाताचा धोका सतत निर्माण होत आहे.
शाळेत लहान मुलांपासून ते माध्यमिक स्तरापर्यंतचे विद्यार्थी दररोज मोठ्या संख्येने ये-जा करतात. रस्ता ओलांडताना त्यांना सतत जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. मागील काही महिन्यांत अपघात टळल्याच्या घटना घडल्या असून, भविष्यात एखादी गंभीर घटना घडण्याआधी प्रशासनाने पावले उचलावी, अशी भावना पालकांमध्ये आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली असून, संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी पालक-शिक्षक संघाला दिले. शाळेच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर शास्त्रोक्त उपाययोजना करणे आता अत्यावश्यक बनले आहे.



