चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील मुख्य रस्त्यांवर दिवसेंदिवस वाहतूक वाढत असून रहदारीस अडथळा निर्माण करणारी वाहने, व नो-पार्किगमध्ये लावलेली वाहने यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून वाहनचालकांना त्रास होत आहे. या प्रकरणाचा त्वरित निपटारा व्हावा, यासाठी सजग नागरिक संघातर्फे नुकतेच सहाय्यक वाहतूक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावर अवैध, जडवाहन वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी चारचाकी वाहनांमूळे रहदारीस, शाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, वाहन चालकांना मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे. यासोबतच शहरातील मुख्य कार्यालयांसमोर वाहने पार्कींग केली जातात. यातच शहराबाहेरुन येणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश दिला जातो. यामुळे येथील वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच भडगांव रोड, स्टेशन रोड, हिरापूर रोड व नागद रोड परीसरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होत आहे. विद्यार्थी, व्यापारी, वाहनधारकांना गैरसोय होत आहे. यात अनेकदा वाहन चालक व नागरीकांमध्ये वाद होत असतात परिणामी यांच्यात हाणीमारी देखील होतात. मुख्य रस्त्यांवर असलेल्या कार्यालयीन विभागाच्या वतीने पार्कींगची व्यवस्था करुन मिळावी, यात रस्त्यावर असलेले स्टेट बॅंक, भारतीय जीवन विमा निगम कार्यालय, आयडीबीआय बँक आदी ठिकाणी पार्कींगची व्यवस्था नसल्याने पार्कींगची गैरसोय होत आहे.
तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेल्या काळी-पिवळी वाहन चालकांना अन्य ठिकाणी जागेची उपलब्धता करुन देण्यात यावी व औरंगाबाद, धुळे, मालेगांव व नांदगाव मार्गे शहरात येणारी अवजड वाहने बायपासने वळवावी त्यामुळे शहरात वाहतूकीची कोंडी निर्माण होत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यात शाळा, महाविद्यालय परीसरात जोरदार धावणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. रात्री बाहेर राज्यातील मोठ्या गाड्या हॉटेल दयानंद जवळील पुलावर रात्री सर्रासपणे लावल्या जातात तर भडगाव रोड उद्यान परिसरात ट्रॅव्हेल्स लावल्या जातात. या सर्व बाबींचा विचार लक्षात घेता वाहतूक पोलिस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी.
यासाठी आज शहरातील सजग नागरीक संघाच्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना निवेदन देण्यात आले. या आशयाची तातडीने सोडवणूक न झाल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी सजग नागरीक संघाच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी गणेश पवार, दिलीप घोरपडे, उदय पवार, मुराद पटेल, स्वप्नील कोतकर, तमाल देशमुख, कुणाल कुमावत, खुशाल पाटील, सागर नागणे, दिपक पाटील, दिलीप सोनार, हरेश जैन, गणेश पाटील, उमेश बर्गे, अक्षय देशमुख, श्रीकांत भामरे आदी सदस्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.