अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळगाव येथील चिखली नदीच्या पूरामुळे दरवर्षी हवालदिल होणाऱ्या भिल्ल वस्तीच्या सुरक्षित पुनर्वसनाची मागणी जोर धरत आहे. एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या पुढाकाराने नुकतेच स्थानिक प्रशासन, आमदार, खासदार आणि राज्य सरकारकडे निवेदन देण्यात आले असून, पूररेषेच्या वरील उंच ठिकाणी वस्तीचे पुनर्वसन करावे, तसेच नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
चिखली नदीच्या पुरामुळे दरवर्षी मरीमाता मंदिराच्या मागील भिल्ल वस्ती पाण्याखाली जाते. १७ ऑगस्ट रोजी आलेल्या पुरात वस्ती जलमय झाली असून, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संसारोपयोगी साहित्यही वाहून गेले आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी, दरवर्षीची ही धास्ती पूरग्रस्त कुटुंबांसाठी जीवघेणी ठरू शकते. याच पार्श्वभूमीवर एकलव्य संघटनेचे तालुका अध्यक्ष गुलाब बोरसे, आबा बहिरम, भगवान संदानशिव, विकास सोनवणे, सुधाकर पवार व विनायक सोनवणे यांनी एकत्र येत निवेदन सादर केले.

सन २००६ मध्ये आलेल्या महापुरात ही वस्ती वाहून गेली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी सिंघल यांनी पुनर्वसनाची हमी दिली होती. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मरीमाता मंदिराच्या मागील जागी घरकुलांसाठी जमीन देण्यात आली. मात्र ती जागाही पूररेषेतच असल्याने धोका कायम आहे. त्यामुळे नवीन सुरक्षित उंच भूखंडावर वस्तीचे पुनर्वसन करण्याची गरज आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.
दरवर्षीचा पूर केवळ भिल्ल वस्तीच नव्हे, तर संपूर्ण अमळगाव, तसेच हिंगोणे, दोधवद, निंभोरा, कलाली, सात्री या गावांचा संपर्क तुटवतो. या गावांसाठी अमळगावातील एकमेव रस्ता पूररेषेलगत आहे आणि प्रत्येक पावसाळ्यात हा रस्ता जलमय होतो. प्रशासनाकडून यासाठी संरक्षण भिंती बांधण्यात आल्याचा दावा केला जातो, मात्र काही भिंती केवळ कागदावरच आहेत, असे ग्रामस्थ सांगतात. अशा वायफळ खर्चाऐवजी स्थायी उपाययोजनांवर भर द्यावा, अशी ग्रामस्थांची ठाम भूमिका आहे.
अजून एक गंभीर बाब म्हणजे स्मशानभूमीही नदीपात्रातच बांधण्यात आली आहे. विशेष म्हणजे २५ वर्षांपूर्वी तत्कालिन सरपंच गिरीश पाटील (जे आजही सरपंच आहेत) यांनी ही स्मशानभूमी नदीच्या धारेत बांधली होती. त्यानंतर तत्कालिन आमदार शिरीष चौधरी यांनी नव्या स्मशानभूमीसाठी निधी मंजूर केला, पण ती जागाही सुरक्षित नसल्याने पाण्याखाली जाते. त्यामुळे सार्वजनिक सुविधा आणि पायाभूत रचनेतील नियोजनशून्यता उजेडात आली आहे.



