रावेर (प्रतिनिधी) जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना जिल्हा उप अभिकर्ता संस्था जळगाव यांच्या वतीने निवेदन देण्यात येऊन रावेर तालुक्यातील खरेदी विक्री संघासह जिल्ह्य़ातील मुक्ताईनगर, बोदवड, चोपडा, पारोळा, भडगाव. अमळनेर, जामनेर तालुक्यातील उप अभिकर्ता संस्थांना शासनाकडून गेल्या दोन वर्षांपासून अनुषंगिक खर्चाचे बाकी असलेले पेमेंट व चालू वर्षांत चना खरेदीच्या अनुषंगिक खर्चापोटी अॅडव्हान्स मिळावा, अशी मागणी संबंधीत संस्थाचालक व सचिवांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
अनुषंगिक खर्चाचे पेमेंट दोन वर्षांपासून शासनाकडे अडकून पडल्याने, संबंधित संस्थांवर अतिरिक्त कर्जाचा बोजा पडला असून संस्था अडचणी सापडल्या आहेत. त्यामुळे नवीन चना खरेदीचा आदेश संस्थांवर टांगती तलवार ठरू शकतो, त्यामुळे शासनाने लवकरात लवकर बाकी पेमेंट व चालू चना खरेदीसाठी अॅडव्हान्स संबंधित संस्था अदा करावा व सहकारी क्षेत्रातील या संस्थांना जिवदान द्यावे. अन्यथा शेतकऱ्यांच्या या संस्थांना लवकरच कुलुपे लागतील,
असेही निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन देतेवेळी रावेर तालुका खरेदी विक्री संघाचे सचिव विनोद चौधरी, प्रशांत पाटील, संजय पाटील, राहुल पाटील, भरत पाटील, श्री राणे, सपकाळे, देशमुख, दिपक पाटील, व्ही.पी. पाटील, गोपाल पाटील, विजय साळुंखे यांच्यासह विविध तालुक्यातील संबंधित संस्थाचे सचिव उपस्थित होते.