पारोळा, प्रतिनिधी | पावसामुळे तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. अशा मागणीचे निवेदन येथील तहसीलदार ए.बी.गवांदे यांना एन.जी.ओ. व शेतकरी संघटने मार्फत नुकतेच देण्यात आले. शेतकऱ्यांनी यावेळी कृषी अधिकारी व आमदारांची भेट घेतली. या वर्षी परतीच्या पावसाने जोरदार थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतलेला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पिकांची काढणी, कापणीच्या वेळेस झालेल्या पावासामुळे खरीप हंगामात येणारे उडीद, मुग, ज्वारी, बाजरी, मका, कापूस काढणी अगोदर सडून नष्ट झालेले आहेत. पशु धनाचाही चारा पुर्णपणे नष्ट झालेला आहे.
उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून गणले जाणारे आद्य व रोखीचे पिक कापूस. कापूस पिकाला अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने तो शेतातच पिवळा व लाल झाला आहे. रोगग्रस्त होवून कापसाच्या कैऱ्या सडून कुजून गळून पडल्या आहेत, राहिलेली काही बोंडे फुटल्याने त्याच्यातून दोन ते तीन पानांचे अंकुर फुटून उगवण झालेली आहे. एकुणच शेतकरी हवालदील होवून चिंतेच्या गर्तेत सापडला आहे. या दिवाळीतच शेतकऱ्यांचे दिवाळे निघून शेतकरी पुर्णपणे उद्धवस्त झाले आहेत.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १) तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, २) एकरी ३०,०००/- रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी,
३) नुकसान झालेल्या पिकावर कर्ज असल्यास ते संपवण्यात यावे, ४) नुकसानीची पंचनामे तातडीने करण्यात यावे, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून पंचनामे केल्यास
नुकसानीचा अहवाल लवकर प्राप्त होईल, तालुक्यात झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून आठ दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्यास शेतकरी संघटनेला नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग अवलंबवा लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, एरंडोल प्रांताधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.
यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष किशोर रामलाल पाटील व सुमित पाटील, सुनील अभिमान साळुंके, सुकदेव भिमसिंग, दत्तू नवल पाटील, शिवाजी राजधर, शरद नानाभाऊ, भूषण बाळासाहेब निकम, उमेश बापुराव, शरद दलपत, गोकुळ रामदास, रामचंद्र भगवान मराठे, भटू आधार पाटील, शांताराम भिमसिंग, अशोक पाटील, योगेश वसंत, वसंत सीताराम, अनिल अर्जुन, भरतसिंग देवसिंग राजपूत, रघुनाथ नानाभाऊ, काशिनाथ नामदेव, यशवंत हिम्मत पाटील आदी उपस्थित होते.