Home Cities अमळनेर कळमसरेतील व्यायाम शाळेसाठी मोठा हॉल व साहित्याची मागणी

कळमसरेतील व्यायाम शाळेसाठी मोठा हॉल व साहित्याची मागणी

0
199

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावात युवकांच्या आरोग्य आणि क्रीडाविकासासाठी कार्यरत असलेल्या विजय व्यायाम शाळेच्या वतीने आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांच्याकडे मोठ्या व्यायाम हॉल व आवश्यक साहित्याच्या मागणीसाठी अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात 30 x 100 फूटाचा हॉल आणि व्यायाम साहित्य आमदार निधीतून मंजूर करून देण्याची विनंती करण्यात आली आहे.

विजय व्यायाम शाळा ही गेल्या अनेक वर्षांपासून कळमसरे गावातील युवकांसाठी व्यायाम व शारीरिक प्रशिक्षणाचे केंद्र ठरत आली आहे. ग्रामपंचायत कळमसरेने या संस्थेसाठी ग्रामपंचायत नोंद क्रमांक 5900 अंतर्गत स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली आहे. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने या जागेवर वॉल कंपाउंड उभारून, व्यायामासाठी एक सुरक्षित आणि शिस्तबद्ध परिसर तयार केला आहे.

सन 2000 साली तत्कालीन आमदार निधीतून एक छोटा व्यायामगृह उभारण्यात आले होते. मात्र, कालांतराने व्यायाम शाळेतील विद्यार्थी संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, सध्याचे उपलब्ध स्थान अत्यंत अपुरे ठरत आहे. त्यामुळे युवकांच्या नियमित सरावात अडथळा येत आहे.

या पार्श्वभूमीवर व्यायाम शाळेचे अध्यक्ष हरीश परशुराम मराठे यांनी आमदार दादासाहेब पाटील यांना विनंती केली आहे की, युवकांच्या आरोग्यवर्धन आणि खेळात प्रगती साधण्यासाठी 30 x 100 फूटाचा मोठा हॉल आमदार निधीतून मंजूर करून द्यावा. तसेच, व्यायामासाठी लागणारे साहित्य (कसरत साहित्य, जिम इक्विपमेंट इत्यादी) देखील उपलब्ध करून देण्यात यावे, अशी विनम्र मागणी या निवेदनात नमूद आहे.

या मागणीसोबत जागेचा अधिकृत उताराही जोडण्यात आला आहे. गावकऱ्यांनी या प्रयत्नाचे स्वागत करत आमदारांनी यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound