नवी दिल्ली-वृत्तसेवा | दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या पथकाने अटक केल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने दिल्ली दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. नऊ वेळा समन्स बजावून देखील ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. त्यांनी याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. आज न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिली. यानंतर लागलीच इडीचे पथक केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांची अनेक तासांपर्यंत चौकशी झाल्यावर केजरीवाल यांना रात्री दहाच्या सुमारास अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या अटकेला आव्हान देण्यासाठी केजरीवाल यांच्या वतीने सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली असून यावर कदाचित रात्रीच सुनावणी होण्याची शक्यता आहे. तर केजरीवाल यांच्या अटकेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आगामी लोकसभा निवडणुकीत हा मुख्य मुद्दा होण्याची शक्यता आहे.