मुंबई वृत्तसंस्था । किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विनला आपल्याकडे घेतल्यावर, दिल्ली कॅपिटल्सची नजर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेवर होती. अखेर दोघांचेही हे स्वप्न पूर्ण झाले आहे. नुकतेच दिल्ली कॅपिटल्सने ट्वीट करत अजिंक्य रहाणे आपल्या संघात सामील झाला असल्याची अधिकृत माहिती दिली आहे.
आयपीएलच्या आगामी हंगामात राजस्थान रॉयल्सचा प्रमुख खेळाडू अजिंक्य रहाणेने अखेरीस आपल्या संघाची साथ सोडली आहे. राजस्थानने रहाणेच्या बदली पत्रावर स्वाक्षरी करून ते दिल्ली कॅपिटल्सकडे पाठविले होते. त्यानंतर आता बीसीसीआयने ही याला मंजुरी दिली आहे. आता आगामी हंगामाकरता अजिंक्य दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या महत्वाच्या बातमीची घोषणा केली आहे. आयपीएलमध्ये अजिंक्यने आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांचं प्रतिनिधीत्व केलं आहे. भारतीय वन-डे आणि टी-२० संघात अजिंक्यला स्थान मिळत नसलं तरीही आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळत असताना त्याने सलामीवीराची भूमिका बजावली आहे. आयपीएलमध्ये अजिंक्यच्या नावावर दोन शतकांचीही नोंद आहे.