संरक्षण भिंतीमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते – पालकमंत्री

पाळधी / धरणगाव प्रतिनिधी । शाळेला संरक्षक भिंत बांधल्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षा तर मिळतेच, पण यामुळे त्यांची एकाग्रता वाढत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी खु. च्या फुलेंनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बांधलेल्या संरक्षण भिंतीचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. 

याबाबत माहिती अशी  की, पाळधी खुर्द गावातील फुलेनगरातील जिल्हा परिषदेच्या शाळेला संरक्षण भिंत बांधण्यात आली असून आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते याचे लोकार्पण करण्यात आले. या भिंतीचे काम मनरेगा, जिल्हा नियोजन समिती आणि चौदावा वित्त आयोग योजनेंतर्गत केले गेले. यासाठी १० लक्ष ४७ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली होती.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या शाळांना संरक्षणक भिंत बांधण्याचा उपक्रम जळगावात घेण्यात आला असून राज्य पातळीवर याची वाखाणणी झाली आहे. शाळांना भिंती बांधल्याने विद्यार्थ्यांना संरक्षण मिळते. यामुळे विद्यार्थी एकाग्रतेने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करू शकतात. तसेच यामुळे परिसर सुशोभीत देखील दिसतो. जळगाव जिल्ह्यातील पाचशेपेक्षा जास्त शाळांना या योजनेच्या माध्यमातून संरक्षक भिंती बांधण्यात येत  आल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली. तर, याप्रसंगी शाळेच्या आवारात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. केवळ वृक्ष न लावता याचे संगोपन करण्याचे सांगत त्यांनी झाडांनी निगा राखण्याचे निर्देश देखील दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मुख्याध्यापक शरद पाटील सर यांनी केले तर आभार केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे यांनी मानले.

या कार्यक्रमाला प. स. सभापती प्रेमराज पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, राजुभैया  पाटील, दिलीप पाटील, दामू अण्णा पाटील, संजय पाटील, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सोनवणे, सरपंच चांदुभाऊ माळी, प्रकाश पाटील, केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे, ग्रामविकास अधिकारी श्री. पाठक, मुख्याध्यापक  शरदआबा पाटील, शाळेचे अध्यक्ष सचिन सरकटे,  अरविंद मानकरी, संदीप पवार, नाना पाटील, बापू मोरे शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content