नागपूर प्रतिनिधी | बेळगावात मराठी माणसाचा नव्हे तर संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव झाल्याची घणाघाती टीका आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठा धक्का देत भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. एकीकरण समिती मराठी माणसांची प्रातिनिधीक संघटना आहे. या संघटनेचा पराभव झाला म्हणून काही लोक महाराष्ट्रात पेढे वाटत आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही, असा संताप व्यक्त केलाय. राऊतांच्या या टीकेला आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
बेळगावात खासदार संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झालाय असे म्हटले. मराठी माणसाचा पराभव कुणीही करु शकत नाही. भाजपच्या नगरसेवकांमध्ये १५ पेक्षा अधिक मराठी नगरसेवक आहेत. एखाद्या पक्षाचा पराभव झाला म्हणून मराठी माणसाचा पराभव होत नाही. मराठी माणसाचा पराभव होऊच शकत नाही, असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी राऊतांना दिलंय.