जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार येथील दीपस्तंभ फाऊंडेशनला जाहीर झाला आहे.
साडेसात लाख रुपये रक्कम व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार २ मार्च, रोजी नाशीक येथे संध्याकाळी ५ वाजता, ठिकाण – कालिदास कलामंदिर , नाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संस्थेला प्रदान करण्यात येईल. या पुरस्काराबाबत संस्थेचे अध्यक्ष प्रा. यजुर्वेंद महाजन म्हणाले की, शाहू, फुले, आंबेडकर या महनीय वक्तींच्या नावाचा हा पुरस्कार आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत प्रेरणादायी आहे. दीपस्तंभ गेल्या १४ वर्षांपासून आदिवासी, ग्रामीण, अपंग, अनाथ अशा विद्यार्थ्यांसाठी निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, कौशल्य प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकसन प्रकल्प तसेच त्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यासाठीचे प्रकल्प जळगाव, पुणे व इतर ८ जिल्ह्यात राबवित आहे. निवासी प्रकल्पात सुमारे २९० विद्यार्थी देशातील ६ राज्यातून व महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातून आलेले आहेत. तसेच सुमारे ४० हजार विद्यार्थी शिक्षक व पालकांना दरवर्षी विविध उपक्रमातून मार्गदर्शन व प्रेरणा मिळत असते. राज्य शासनाचा हा अतिशय मानाचा पुरस्कार आम्ही आपल्या देशासाठी सीमेवर लढणार्या आणि प्रसंगी शहीद होणार्या आमच्या सर्व सैनिकांना समर्पीत करत असल्याचे महाजन यांनी आवर्जून नमूद केले.