Home मनोरंजन ‘बिग बॉस मराठी 6’ मध्ये दिपाली सय्यद अनभिज्ञ ; कुटुंबावर दुःखाचा डोंगर 

‘बिग बॉस मराठी 6’ मध्ये दिपाली सय्यद अनभिज्ञ ; कुटुंबावर दुःखाचा डोंगर 


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। ‘बिग बॉस मराठी 6’ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून घरातील स्पर्धकांमध्ये रंगतदार स्पर्धा सुरू आहे. मात्र, या गाजणाऱ्या रिअॅलिटी शोच्या घरात असलेल्या अभिनेत्री दिपाली सय्यद हिला बाहेरच्या जगात घडलेल्या अत्यंत दु:खद घटनेची अजूनही कल्पना नाही. तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून जवळच्या व्यक्तीने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती तिचे पती बॉबी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उघड केली आहे.

Bigg Boss Marathi 6 या शोमध्ये सहभागी झालेल्या दिपाली सय्यद हिच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी भावनिक परीक्षा मानली जात आहे. घरात असताना स्पर्धकांना बाहेर काय घडत आहे याची कोणतीही माहिती दिली जात नाही, हा शोचा नियम आहे. त्यामुळे दिपालीला तिच्या सासूबाईंच्या निधनाबद्दल अद्याप काहीच कळलेले नाही. तिचे पती बॉबी यांनी सांगितले की, नुकतेच त्यांच्या आईचे निधन झाले असून त्या दिपालीच्या अतिशय जवळच्या होत्या.

बॉबी यांनी मुलाखतीत सांगितले, “माझी आई दिपालीला मुलीसारखीच मानायची. ‘तू बिग बॉस जिंकल्यानंतर मी नक्की येईल,’ असे ती नेहमी म्हणायची. पण आता आई आपल्यात नाही, हे सत्य दिपालीला माहिती नाही. सध्या ती घरात खूप चांगला खेळ खेळत आहे, त्यामुळे तिच्या खेळावर परिणाम होऊ नये म्हणून आम्ही तिला काहीच सांगितलेले नाही.” २ फेब्रुवारी रोजी त्यांच्या आईने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती देताना बॉबी भावूक झाले.

ते पुढे म्हणाले, “आईला डॉक्टरकडे जायचे असेल किंवा कुठे बाहेर जायचे असेल, तर तिला दिपालीचीच गरज भासायची. दिपाली तिची सर्वत्र काळजी घ्यायची. आई काही बोलत नसे तेव्हा आम्ही तिला दिपालीचा आवाज ऐकवायचो. दोन वेळा तिला रुग्णालयात दाखल केले होते आणि ती परत घरी आली होती. पण यावेळी असे काही होईल, असे वाटले नव्हते. आता सगळे निर्णय मलाच घ्यावे लागत आहेत आणि त्यामुळे दिपालीची खूप आठवण येते.”

या दुःखद प्रसंगानंतर दिपालीचा मुलगा अली यानेही आपल्या भावना व्यक्त केल्या. “आजी आणि आईच सगळं बघायच्या. शेवटपर्यंत आजी आई आणि पप्पांनाच शोधत होती,” असे म्हणत त्याने आपल्या भावना मोकळ्या केल्या. कुटुंबावर आलेल्या या आघातामुळे घरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, दिपाली सय्यद शोमध्ये अत्यंत आत्मविश्वासाने आणि जिद्दीने खेळत असून प्रेक्षकांचा पाठिंबा तिला मिळताना दिसत आहे. मात्र, बाहेर तिच्या आयुष्यात घडलेली ही वेदनादायक घटना समोर आल्यानंतर प्रेक्षकही भावूक झाले आहेत. ती घराबाहेर आल्यानंतर हा मोठा धक्का कसा स्वीकारेल, याबाबत चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.


Protected Content

Play sound