जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करणाऱ्या सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षीस वितरण सोहळा २०२६ मध्ये श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक दाभाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक बांधिलकीची आणि संस्थेच्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा सोहळा १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन येथे उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुमामा भोळे होते. मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, गुणवंत पुरस्कारार्थींनी समाजाने दिलेल्या शाबासकीचे उत्तरदायित्व स्वीकारणे आवश्यक आहे. “दैनंदिन जीवनात ८० टक्के वेळ कामासाठी, १० टक्के वेळ वैयक्तिक आयुष्यासाठी जातो; मात्र उर्वरित १० टक्के वेळ राष्ट्रसेवा, समाज आणि गावाच्या उन्नतीसाठी देणे अपेक्षित आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला दीपमाला काळे (महापौर, जळगाव शहर), जयश्री महाजन (माजी महापौर व विद्यमान नगरसेविका), गायत्री भंगाळे (लोकनियुक्त नगराध्यक्ष, भुसावळ), विजय पवार (शिक्षण विस्तार अधिकारी), प्रो. रफिक शेख (एच.ओ.डी., डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन, जी.एच. रायसोनी कॉलेज), भारती काळे (संचालिका, हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट), सुनील पाटील (आर.सी. पटेल संस्था, शिरपूर), ॲड. निखिल पाटील, संघपाल तायडे (सिने गायक), अर्चना माळी (संचालिका, आर्चिज ब्यूटी ॲकॅडमी), निता सोनवणे (अध्यक्ष, मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था व माजी नगरसेविका) आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपक दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानने समाजोपयोगी उपक्रम, शैक्षणिक मदत, आरोग्य शिबिरे आणि सामाजिक जनजागृती यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजातील वंचित घटकांना बळ मिळाले असून, अनेक तरुणांना सकारात्मक दिशादर्शन झाले आहे. या कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आल्याने उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन किशोर पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन हेमंत बडगुजर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुरुषोत्तम लोखंडे, जनमत प्रतिष्ठानचे सचिव हर्षाली पाटील, शशिकांत भावसार, विजय लुल्हे, आदर्श शिक्षिका ज्योती राणे, हेमंत बडगुजर, कलाशिल्पकार सुनील दाभाडे आदींनी सहकार्य केले. देविदास सूर्यवंशी, वृक्षमित्र सुरेंद्र चौधरी, वल्लभ सूर्यवंशी, कृतिका सूर्यवंशी यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



