नवी दिल्ली वृत्तसंस्था । शेतकरी आंदोलनात चिथावणी देऊन हिंसाचार घडवून आणण्याच्या आरोपातून पंजाबी अभिनेते दीप सिध्दू याला आज अटक करण्यात आली आहे.
लाल किल्ल्यावरील हिंसाचारनंतर दीप सिद्धूचं Dip Siddhu नाव समोर आलं होतं. गेल्या 14 दिवसांपासून तो फरार झाला होता. यानंतर आता सिद्धूला अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आलं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली बॉर्डरवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली मात्र यावेळी काही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. थेट लाल किल्ल्यात घुसून शेतकऱ्यांनी धर्मध्वज फडकवला, शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप दीप सिद्धूवर ठेवण्यात आला आहे. दीप सिद्धू याच्यासह इतर सहा जण देखील फरार होते. या सर्वांच्या अटकेसाठी काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी बक्षीस जाहीर केलं होतं. यामध्ये दीप सिद्धूसह चार जणांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी एक लाखाचं रोख बक्षीस तर उर्वरित तीन जणांची माहिती देणाऱ्यास प्रत्येकी 50,000 रुपयांचं बक्षीस मिळेल असं म्हटलं होतं.