अमळनेर प्रतिनिधी | तालुक्यात ऑगस्ट महिना सुरू झाला असला तरीही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे दुष्काळ घोषीत करावा अशी मागणी शिवसेनेने केली असून याबाबतचे निवेदन प्रांताधिकार्यांना देण्यात आले आहे.
शिवसेनेने उपविभागीय अधिकार्यांना निवेदन सादर करून दुष्काळ घोषीत करण्याची मागणी केली आहे. यात म्हटले आहे की, तालुक्यात तरी फक्त ११० मिमी पाऊस झाला असून, ४१ हजार ६८९ हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी झाली आहे. ३२ हजार शेतकर्यांनी तालुक्यात पीक विमा काढला आहे. त्याच प्रमाणे महारेन आणि महावेध या दोन प्रणालींच्या पर्जन्यमान नोंदीत तफावत आढळून आली आहे. महारेन प्रणाली मार्फत तालुक्यात सरासरी ११०.१०मिमी पावसाची नोंद दाखवली जाते. तर महावेध कंपनीच्या स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे तालुक्यात १७६ मिमी पावसाची नोंद दाखवली जात आहे. म्हणजे तब्बल ६६.१० मिमी पावसाची तफावत आहे. विमा कंपनी नफेखोरीसाठी खासगी कंपनी पर्जन्य अधिक दाखवणारे यंत्र लावत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आले आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, अमळनेर तालुक्यात दुष्काळ घोषीत करणे आवश्यक आहे. तसेच तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ८२ हजार ३९९.४३ हेक्टर असून लागवडी लायक क्षेत्रफळ ६९हजार ७४१.७७ हेक्टर आहे. ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने, ३२ हजार शेतकर्यांना विमा देण्याचे आदेश विमा कंपनीला द्यावेत अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे.
हे निवेदन उपविभागीय अधिकार्यांना देतांना शिवसेनेचे तालुका प्रमुख विजय पाटील, शहर प्रमुख संजय पाटील, उपजिल्हाप्रमुख डॉ.राजेंद्र पिंगळे, अनंत निकम, सुरेश पाटील, प्रताप शिंपी आदी उपस्थित होते.