मुंबई, प्रतिनिधी | राज्यात भारतीय जनता पक्षाचेच सरकार पूर्ण बहुमताने येईल आणि देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री होतील असे भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी युतीच्या विषयाला बगल देत जाहीर केले असले, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र युतीची चिंता आम्हालाही असल्याचे स्पष्ट केले आहे. युतीची आवश्यकता असल्याचे अधोरेखित करत मुख्यमंत्र्यांनी युतीबाबतचा निर्णय लवकरच होईल, असेही म्हटले आहे. युतीबाबत लवकरच चर्चा सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मुंबईत येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत प्रश्न विचारल्यानंतर, राणेंच्या पक्षप्रवेशाबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांचे स्वागत केले. विशेषत: मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांच्या कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याच्या निर्णयाचे कौतुक केले.