नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्र सरकारने कलम-३७० रद्द करण्याबाबतचे विधेयक लोकसभेत मांडले असून यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादळी चर्चा रंगली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम-३७० रद्द करण्याची घोषणा केली. याला राज्यसभेने मंजुरीदेखील दिली. यानंतर आज हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले आहे. हे विधेयक मांडल्यानंतर विरोधकांनी यावर कडाडून टीका केली असून भाजपने याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभेतील काँग्रेस गट नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले कील सरकारने पाकव्याप्त काश्मीरचा विचार केला गेला नाही, असं चौधरी म्हणाले. जम्मू-काश्मीरच्या संदर्भात भारत-पाकिस्तानमध्ये अनेक द्विपक्षीय करार झाले आहेत. मग हा प्रश्न अंतर्गत कसा, असा प्रश्नही चौधरी यांनी उपस्थित केला. यावर गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, जम्मू-काश्मीरबद्दल कायदा करण्याचा भारतीय संसदेला पूर्ण अधिकार आहे. कोणीही संसदेला तसं करण्यापासून रोखू शकत नाही. काँग्रेसला हा प्रश्न सोडवण्यात रस होता का, हा खरा प्रश्न आहे. आम्ही जेव्हा जम्मू-काश्मीरबद्दल बोलतो, तेव्हा त्यात पाकव्याप्त काश्मीर असतेच. त्यासाठी जीवही देऊ. तर अनुच्छेद ३७० मधील कलम १ आधीप्रमाणेच ठेवण्यात आल्याची बाबही शाह यांनी चौधरी यांच्या लक्षात आणून दिली.