
जळगाव (प्रतिनिधी) कर्जबाजारी व आजाराला कंटाळून एका 48 वर्षीय प्रौढाने 28 रोजी विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, सुनील धोंडू चौधरी (वय 48 रा.कासोदा ता.एरंडोल जि. जळगाव) यांचे बांभोरी शिवारात शेत आहे. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पत्नीला कॅन्सरच्या आजार आणि शेतातील सततची नापिकीमुळे त्यांच्यावर दोन ते अडीच लाखाचे कर्ज होते. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. या सर्वाला कंटाळून नैराश्येतून श्री. चौधरी 28 मे रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास आपल्या शेतात पिक फवारणीचे औषध प्राशन केले होते. विष घेतल्यानंतर त्यांनी जावईला फोन करून विषारी औषध घेतल्याचे सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास प्रकृती अधिक खालावल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, पत्नी, दोन भाऊ, आई-वडील, जावई असा परिवार आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.