जळगाव प्रतिनिधी | शहरातील राष्ट्रीय महामर्गावर मानराजपार्क जवळ बुधवार 3 रोजी सायंकाळी भरधाव कंटेनरने धडक दिल्याने दुचाकीस्वार सेवनिवृत्त नायब तहसीलदार अरुण महादु बागुल हे गंभीर झाले होते. त्यांचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील खोटे नगर येथील रहिवासी सेवानिवृत्त नायब तहसीलदार अरुण महादु बागुल (वय-60, रा.अहिल्यादेवी भोईटे नगर, खोटे नगर जवळ) हे त्यांच्या दुचाकी (एम.एच.19.के.6227) ने गावातून मसाले खरेदी करुन घराकडे जात होते. बुधवार 3 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास मानराज पार्क चौक जवळ मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने (जी.जे. 27 व्ही.0024)ने त्यांना जोरदार धडक दिली. अपघात घडला त्यावेळी गुजराल पेट्रोलपंप चौकात ड्युटवर असलेले वाहतुक पोलिस कर्मचारी मदतीला धावले. अरुण बागुल यांच्या दोन्ही पायावरुन ट्रकचे चाक गेल्याने त्यांना गंभीर अवस्थेत ट्रक खालून रविंद्र पाटील यांनी बाहेर काढले. त्यानंतर त्यांना रिक्षाने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने नातेवाईकांनी त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू आज (गुरुवार) पहाटे दोन वाजेच्या सुमारास श्री.बागुल यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कंटेनर चालक तस्वीर सिंग निरंजन सिंग (वय 60, अमुराद ता.अजनाद, जि.अमृतसर, पंजाब) याला रामानंदनगर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.