जळगावात भिक्षुकी करणाऱ्या मुलाचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । शहरात भिक्षुकी फिरणाऱ्या १८ वर्षीय तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने तरूणावर अंत्यविधी करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, मंगेश संजय ढाकणे (वय-१८) रा. बाळापूर जि. आकोला हा मुलगा गेल्या आठ ते दहा वर्षांपासून जळगाव शहरात एकटाच राहत होता. मंगळवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी त्याला श्वासोच्छवास घेण्यात त्रास होत होता. अश्यावेळी सामाजिक कार्यकर्ते आयुष मणियार यांनी पुढाकार घेतला.  आयुष मनियार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला कपडे व जेवन दिले. त्यानंतर त्याला विश्वासात घेवून त्याचे नाव व गाव विचारले. वडील संजय तुकाराम ढाकणे यांचा मोबाईल नंबर दिलेला होता. आयुष माणियार यांनी अत्यवस्थ झालेल्या मंगेशला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. १५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मंगेश ढाकणे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासंदर्भात माणियार यांनी दिलेल्या मोबाईलवरून संपर्क साधून मयत मुलाच्या वडीलांशी संपर्क साधून माहिती दिली. गुरूवारी १६ डिसेंबर रोजी सकाळी मयत मुलाचे वडील आल्यानंतर मुलाच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक रविंद्र पाटील हे करीत आहे.

 

Protected Content