जळगाव | शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या समांतर रस्ते व चौपदरीकरण कामाला पहिल्या टप्यात काढलेल्या निविदेची मुदत आज बुधवारी २७ रोजी संपत असून गुरुवारी २८ रोजी या निविदा उघडण्यात येणार आहे. त्यामुळे चौपदरीकरणाच्या कामाचा मार्ग मोकळा होणार आहे.
शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्र.6च्या ८ किलोमीटर पर्यंतच्या लांबीचे चौपदरीकरण करणे व तीन चौकांमध्ये वाहनांसाठी भुयारी मार्ग व एका ठिकाणी पादचार्यांसाठी भुयारी मार्ग करण्याच्या कामासाठी ६९ कोटी २६ लाखाच्या खर्चाची ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. मक्तेदाराला हे काम दीड वर्षात पूर्ण करावे लागणार आहे. तर या कामाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी देखील १० वर्षापर्यंत मक्तेदाराचीच असणार आहे. या कामासाठी २० डिसेंबरपासून ई-निविदा मागविण्यास सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान ३१ जानेवारीही त्या कामासाठी अंतिम मुदत ठरविण्यात आली होती. १ फेब्रुवारीला निविदा उघडून त्यानंतर कार्यादेश देण्यात येणार होते. मात्र निविदेत प्रशासनातर्फे बदल करण्यात येवून पथदिव्यांचे काम या निविदेतून वगळण्यात आले होते. त्यामुळे या निविदेची मुळ किंमत ६९ कोटींवरुन ६२ कोटींपर्यंत खाली आली होती. नवीन बदलामुळे निविदा दाखल करण्यास आणखी १० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे ११ फेब्रुवारीला निविदा उघडणे अपेक्षित होते. मात्र ही मुदत पुन्हा २१ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी आणि नंतर २७ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली. बुधवारी २७ फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (नही)च्या नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयात निविदा संकलित केल्यानंतर गुरुवारी 28 फेब्रुवारी रोजी या निविदा उघडण्यात येणार आहे.
चौपदरीकरणाला आचारसंहितेचा ब्रेक
चौपदरीकरणाचे कामाची निविदा उघडून कार्यादेश देण्याची प्रक्रिया आचारसंहितेपूर्वीच पूर्ण होणार अपेक्षित होते. मात्र निविदा मागविण्याच्या प्रक्रियेला वारंवार मुदतवाढ देण्यात आल्यामुळे प्रत्यक्ष कार्यादेश म्हणून काम सुरु होण्यास विलंब लागण्याची शक्यता असल्यामुळे या कामाला आचारसंहितेचा ब्रेक लागून खोडंबा होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.