रावेर प्रतिनिधी । शनिवारी नागोडी नदीच्या पुरात वाहून बेपत्ता झालेल्या अजनाड येथील शेतमजूर तरूणाचा मृतदेह नदीच्या बंधार्यात मिळून आला. या बाबत रावेर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या बाबतचे वृत्त असे की दीपक रामकृष्ण पाटील (वय ३९ राहणार अजनाड) यांनी घरी जाण्यापूर्व दि.२९ शनिवारी रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास आपल्या पत्नीला मी चोरवड येथे आलेलो असल्याचा भ्रमणध्वनी केला होता. मात्र ते घरी पोहचलेच नाही. अखेर रविवारी सकाळी त्यांच्या पत्नीने रावेर पोलीस ठाण्यात येऊन हरवल्याची नोंद केली होती. दरम्यान दीपक पाटील हे चोरवड जवळील नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याची भिती व्यक्त होत होती. दरम्यान पोलीस प्रशासन व ग्रामस्थांचे त्यादृष्टीनेही शोध मोहीम कार्य सुरू असताना आज सकाळी नऊ वाजता दीपक पाटील यांचा मृतदेेेह जवळच असलेल्या बंधार्यात काट्यांमध्ये अडकलेला आढळून आला. या अनुषंगाने रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री श्रीराम वानखेडे ,बिजू जावरे तपास करीत आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे आणि सहाय्यक निरीक्षक शिवाजी पाळदे यांनी भेट दिली.
दरम्यान, दीपक पाटील हे शेत मजुरी करून कुटुंबाचा उदर निर्वाह करीत होते.त्यास पत्नी, एक मुलगा,एक मुलगी ,आई असा परिवार आहे. त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर डोंगर कोसळले आहे त्यांच्या परिवारास नैसर्गिक आपत्तीतून आर्थिक मदत करावी अशी मागणी आहे.