साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । वाघूर नदी पात्रातील प्रवाहात आज सकाळी साकेगावातील दोन महिला वाहून गेल्या असून यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला असला तरी दुसरी महिला अद्याप बेपत्ता असल्याने तिचा शोध सुरू करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, वाघूर नदीच्या पात्रात सध्या तुलनेत कमी पाणी आहे. काही दिवसांपूर्वी नदी पात्र दुथडी भरून वाहत असले तरी सध्या पाऊस नसल्याने पात्रात कमी पाणी आहे. या पार्श्वभूमिवर, येथील सिंधूबाई अशोक भोळे आणि योगिता राजेंद्र भोळे या दोन महिला आज सकाळी नदी पात्रात गेल्या होत्या. त्या काही दिवसांपूर्वीच बांधण्यात आलेल्या नवीन पुलाच्या वरील बाजूस गेल्या होत्या.
दरम्यान, धरणातून पाणी सोडल्यामुळे अचानक पात्रातील पाण्याचा प्रवाह वाढू लागला. त्यांनी मदतीसाठी हाका मारल्या तरी याचा काही उपयोग झाला नाही. अवघ्या काही मिनिटांमध्ये त्या पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत वाहून गेल्या. ग्रामस्थांनी लागलीच या दोन्ही महिलांचा शोध सुरू केला. यानंतर दुपारच्या सुमारास सिंधूबाई भोळे यांचा मृतदेह वाघूर नदीला मिळणार्या भोजाच्या नाल्याचा भागात आढळून आला. त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात येऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
तर योगिता राजेंद्र भोळे यांचा मृतदेह अद्यापही आढळून आला नसून त्यांचा कसून शोध सुरू आहे. या प्रकरणी तालुका पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Sakegaon, tal Bhusawal;