नवी दिल्ली । रेल्वेत विना तिकिट प्रवास करणे, चेन पुलींग वा धुम्रपान करणे आदी कृत्ये आता ‘किरकोळ गुन्हे’ या प्रकारात वर्ग करण्यात येणार असून यासाठी शिक्षा नव्हे तर जागेवरच दंडात्मक कारवाईचे प्रावधान करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने रेल्वेशी संबंधीत अनेक गुन्ह्यांना किरकोळ या प्रकारात वर्गीकृत करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये विनातिकीट प्रवास करणे (कलम १३७), सुरक्षा साखळी खेचणे (कलम १४१), बेकायदेशीरपण वस्तू विक्री (कलम १४४), उपद्रव करणे (कलम १४५), रूळ ओलांडणे (कलम १४७), तिकीटात फेरफार करणे (कलम १५७), महिलांच्या डब्यातून प्रवास (कलम १६२), कचरा करणे (कलम १६६), सिगारेट ओढणे (कलम १६७) अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे निर्गुन्हेगारीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. यासारखे गुन्हे आता गंभीर स्वरूपाचे गुन्हे राहणार नाहीत. कारण केंद्र सरकारने अशा स्वरूपाच्या छोट्या गुन्ह्यांचे निर्गुन्हेगारीकरण करण्याचा प्रस्ताव आणला आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांना किरकोळ गुन्ह्यांच्या यादीत समाविष्ट केले जाणार असल्याने अशा गुन्ह्यांत तुरुंगवासाची शिक्षा न देता जागेवरच दंडात्मक कारवाई करून आरोपींना सोडण्यात येणार आहे.
कायदा व सुव्यवस्था आणि न्याय यंत्रणेवरील भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने किरकोळ गुन्ह्यांचे निर्गुन्हेगारीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात सध्या अस्तित्वात असलेल्या १९ कायद्यांतील तुरुंगवासाच्या शिक्षा असलेल्या कलमांची यादी सादर केली आहे. जागच्या जागी दंड वसुलीसाठी स्मार्टफोनचे अॅप तयार करण्यात येणार आहे.
केंद्र सरकार यासाठी विद्यमान कायद्यांमध्ये सुधारणा करणार असून याचा मसुदा अंतिम टप्प्यात आलेला आहे. या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.