जामनेर प्रतिनिधी । तालुक्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याचे उघडकीस आली. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील रहिवाशी प्रकाश मोतीलाल सरताळे (वय-५६) रा. वाकी रोड पंचम भुवन जामनेर हे कामाच्या निमित्ताने जळगाव घराला कुलुप लावून २ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास बाहेरगावी गेले होते. तर दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरी परत आल्यावर अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडलेले दिसून आले. यावेळी घरात ठेवलेले ६० ते ७० हजार रूपयांची रोकड लंपास केल्याचे उघडकीस आले.
तर दुसऱ्या घटनेत तालुक्यातील नेरी बु॥ येथील रहिवाशी अशोक काशिराम बावस्कर (वय-६०) रा. नेरी बु॥ ता. जामनेर यांच्या बंद घरात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील सोन्याचे दागीने, सोन्याच्या अंगठ्या आणि १२ हजार रूपये रोकड लंपास केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रकाश इंगळे व पोनि प्रताप इंगळे हे करीत आहे.