Home Uncategorized मुलीला कुकरने मारले तर पत्नीला काचेने; जळगावात संतापजनक घटना

मुलीला कुकरने मारले तर पत्नीला काचेने; जळगावात संतापजनक घटना


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील चंदू अण्णा नगरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मद्यपान केलेल्या बापाने मोबाईलवरील गाणे बंद केल्याच्या रागातून आपल्या अकरावीत शिकणाऱ्या मुलीला कुकरच्या झाकणाने मारहाण केली, तर पत्नीला काचेचा ग्लास फोडून जखमी केले. ही अमानुष घटना शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता घडली. या प्रकरणी समाधान विजयसिंग पाटील (वय ३२, रा. चंदू अण्णा नगर) याच्याविरुद्ध शनिवारी १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समाधान पाटील हा मद्यपान करून घरी आला आणि त्याने पत्नीच्या मोबाईलवर गाणे लावले. त्यावेळी त्याची मुलगी प्राप्ती पाटील, जी अभ्यासात व्यस्त होती, तिने वडिलांना गाणे बंद करण्यास सांगितले. मात्र, वडिलांनी ऐकले नाही, म्हणून प्राप्तीने स्वतःच मोबाईलवरील गाणे बंद केले. या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या समाधानने काचेचा ग्लास फोडून पत्नी जागृती पाटील हिला मारहाण करण्यास सुरुवात केली.

आईला मारहाण होताना पाहून मुलगी प्राप्ती तिला सोडवण्यासाठी पुढे सरसावली. तेव्हा क्रूर बापाने कुकरच्या झाकणाने तिच्या हातावर मारून तिला जखमी केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पत्नी आणि मुलीला मारहाण केल्यानंतर समाधान पाटील हा आपले मूळ गाव कल्याणेहोळ येथे पळून गेला. तिथे त्याने आपल्या आई-वडिलांकडे “या दोघींचा खून करणार” असे सांगितले असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी पत्नी जागृती पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी समाधान पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


Protected Content

Play sound