Home Cities जळगाव दापोरा गाव पीक विम्यापासून वंचित : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली तातडीने...

दापोरा गाव पीक विम्यापासून वंचित : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली तातडीने दखल 


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव तालुक्यातील दापोरा गावातील शेतकऱ्यांना या वर्षी पीक विम्यापासून वंचित राहावे लागले आहे. कारण, विमा कंपनीने गावाची नोंद चुकीच्या मंडळात केल्याने शेतकऱ्यांना अपार आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची काल पाळधी येथे भेट घेतली आणि आपल्या व्यथा मांडल्या. त्यानंतर मंत्री पाटील यांनी तातडीने याची गंभीर दखल घेत, संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले.

दापोरा हे गाव यापूर्वी पिंप्राळा मंडळांतर्गत येत होते. मात्र, विमा कंपनीने गावाचा समावेश चुकीने कढोली मंडळात केल्याने, पीक विमा योजनेत गावातील अनेक शेतकरी अपात्र ठरले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेत, गावातील काही शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन, दापोरा गावाला पुन्हा पिंप्राळा किंवा म्हसावद सर्कलमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली.

या मागणीच्या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री पाटील यांनी तातडीने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याशी संपर्क साधून, दिनांक 17 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात एक विशेष बैठक आयोजित केली. या बैठकीला महसूल अधिकारी, विमा अधिकारी आणि शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ हजर होते. बैठकीत मंत्री पाटील यांनी विमा अधिकाऱ्यांना जाब विचारला की, “तुमच्या अडचणी काय आहेत, स्पष्ट सांगा. जर हे तुमच्याच स्तरावर सुटत नसेल तर मी स्वतः कृषीमंत्र्यांशी बोलतो आणि त्यांच्यासोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढतो.”

या बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, व्यापारी शेतमाल कवडीमोल दराने खरेदी करतात, यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. या समस्येवर लक्ष केंद्रित करावे, अशी विनंती त्यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना केली. मंत्री पाटील यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित यंत्रणांना याबाबत तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

शेवटी, या बैठकीतून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याची दिशा निश्चित झाली असून, लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Protected Content

Play sound