जळगाव (प्रतिनिधी) ‘स्वच्छ शहर सुंदर शहर’ असे ब्रीद वाक्य असलेल्या जळगाव महापालिकेशेजारी असलेल्या गोलाणी मार्केटजवळील गटारीत कचरा साचल्याने या गटारीचे पाणी रविवारी थेट रस्त्यावर वाहत होते. गोलाणी मार्केट ते थेट जयप्रकाश नारायण चौकापर्यंत या गटारीचे घाण पाणी वाहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गोलाणी मार्केटजवळ रिक्षा थांबा असून ह्या रिक्षाही त्याच घाण पाण्यात उभ्या कराव्या लागत आहेत. मार्केटमध्ये येणाऱ्या नागरिकांनाही आपली वाहने गटारीच्या पाण्यातच उभी करावी लागत आहेत. तसेच या पाण्यातूनच सायकलस्वार तसेच दुचाकीस्वार यांना कसरत करून मार्ग काढावा लागत आहे. या घाण पाण्याशेजारीच खाद्यपदार्थ विक्रेते विक्री करीत असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासन याकडे लक्ष देईल का ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातंर्गत झालेल्या स्पर्धेनिमित्त झालेल्या सर्वेक्षणात जळगाव शहराने स्वच्छतेबाबत देशभरात ७६ क्रमांक प्राप्त केला होता. ‘स्वच्छ भारत-२०१८’ मध्ये जळगाव शहराने ८४ वा क्रमांक मिळवला होता. स्वच्छतेच्या रॅकिंगमध्ये पहिल्या १०० मध्ये राज्यातील २८ शहरांचा सहभाग असून, राज्यात जळगाव शहराने २१ वा क्रमांक प्राप्त केला आहे. मात्र, हे सगळे सत्य असूनही महापालिकेच्या शेजारील गटारीचे चोकअप काढण्याचा महापालिकेच्या आरोग्य विभागाला विसर पडल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत.