यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सार्वजनिक वाहतुकीचा कणा मानल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसचा प्रवास यावलमध्ये दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे. यावल आगारातील जुन्या आणि भंगार झालेल्या बसगाड्यांमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, या गंभीर प्रश्नाकडे परिवहन प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे. अपघातांची मालिका सुरू असताना देखील यंत्रणांची उदासीनता पाहता, “एसटी महामंडळ एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल आता प्रवासी वर्गातून विचारला जात आहे.
सध्या यावल आगारात जवळपास ४० ते ४५ बसगाड्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. या बसेस वारंवार पेट घेतात, ब्रेक फेल होतात, आणि अनेकदा रस्त्यातच बंद पडतात. यामुळे प्रवाशांचा प्रवास अक्षरशः जीवावर उदार होऊन करावा लागत आहे. अद्यापपर्यंत मोठ्या जीवितहानीच्या घटना घडलेल्या नसल्या तरी सुदैवच कारणीभूत ठरत आहे. मात्र, प्रवाशांचा संयम सुटू लागला असून ते आता परिवहन प्रशासनाला जबाबदार धरत आहेत.

अत्यंत खराब स्थितीतील बसेस नियमितपणे रस्त्यावर धावत आहेत आणि त्यातून शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलाही प्रवास करत आहेत. सर्वसामान्यांसाठी एकमेव स्वस्त व सुरक्षित पर्याय असलेली ‘लालपरी’ आता त्यांच्या जीवाशी खेळू लागली आहे. इतकं असूनही स्थानिक लोकप्रतिनिधी व विभागीय अधिकारी या प्रश्नाकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे.
यावल आगाराच्या व्यवस्थापकांना महामंडळाच्या उत्पन्नात वाढ करून देण्याची जबाबदारी असली, तरी खराब वाहनांमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ होतो आहे. अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतर उपाययोजना करण्यात येणार आहेत का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. एसटी महामंडळाने हा गंभीर प्रश्न गांभीर्याने न घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा प्रवासी वर्ग देत आहे.
प्रवाशांनी विभागीय नियंत्रकांकडे मागणी केली आहे की, यावल आगारातील नादुरुस्त व भंगार झालेल्या सर्व बसगाड्या त्वरित रस्त्यावरून हटवाव्यात. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी नव्या व तांत्रिकदृष्ट्या सक्षम बसगाड्या उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा, संभाव्य अपघातांमुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.



