औरंगाबाद (वृत्तसंस्था) येथे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपा आणि शिवसेना नेत्यांमधील सुरू असणारी बैठक तब्बल दोन तासांनतर संपली आहे. या बैठकीमध्ये अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वाद मिटला आहे. अर्जुन खोतकर यांनी माघार घेतल्यामुळे जालना मतदार संघातून अखेर रावसाहेब दानवेच निवडणुक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह शिवसेना पक्षअध्यक्ष उद्धव ठाकरे, संजय राऊत, रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर उपस्थित होते. शिवसेना-भाजप युतीच्या घोषणेनंतर दोन्ही पक्षांतील स्थानिक पातळीवरील वाद आणि नेत्यांमधील तेढ कमी करण्यासाठी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अद्यापही औरंगाबाद आणि जालना या दोन्ही ठिकाणी उमेदवार ठरविता आलेले नाही. जागांचा तिढा न सुटल्याने प्रतिस्पर्धी उमेदवार कोण, हे अद्याप अस्पष्ट आहे.