यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील आडगाव येथील शाळेला संतप्त तरुणांनी कुलुप ठोकल्याची घटना आज (दि.१) घडली असुन या घटनेनंतर अनेक वर्षांपासुन निद्रावस्थेत असलेल्या शिक्षण विभागाला अचानक जाग आली आहे. काही अधिकाऱ्यांनी तत्काळ तेथे भेट देवून नवी इमारत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, आडगाव येथील जिल्हा परिषदच्या सुमारे ५० वर्षे जुन्या व अत्यंत पडक्या झालेल्या खोलीमध्ये शाळा भरवली जात होती. याबाबत आडगाव येथील ग्रामस्थांनी वारंवार पंचायत समितीकडे व शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या असुन त्याची दखल घेतली जात नसल्याने अखेर आज शालेय व्यवस्थापन समिती आडगावचे उपाध्यक्ष विश्वजीत सुरेश पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थित शाळेला कुलुप ठोकण्यात आले. आजचा प्रकार व यापूर्वी ग्रामस्थांनी केलेला पत्रव्यवहार बघून गट शिक्षण अधिकारी एजाज शेख, शालेय पोषण आहार अधिक्षक नईम शेख, केन्द्र प्रमुख प्रमोद सोनार, केंद्र प्रमुख विजय ठाकुर यांनी तात्काळ शाळेला भेट दिली व इमारतीची पाहणी केली. ही इमारत फारच जीर्ण असल्याचे लक्षात येताच त्यांनीही शाळेचे मुख्याध्यापक महाजन व इतर शिक्षक आणि शिक्षिका यांना इमारत पडकी आहे, त्यात कोणालाही बसू देऊ नका. अशा सुचना दिल्या व पुढच्या इमारत बांधकाम संदर्भात पत्रव्यवहार करून लवकरात लवकर नवीन इमारत उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.