बोदवड प्रतिनिधी । नाडगाव येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या चार्यांमुळे या भागातील शेतकर्याचे नुकसान झाल्याने ठेकेदाराने याची भरपाई करून देण्याची मागणी होत आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील नाडगाव येथे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु आहे. या पुलाचा भराव टाकणे सुरु असुन पावसाचे पडणारे पाणी वाहुन नेण्यासाठी रस्त्याच्या शेजारी चार्या खोदलेल्या आहेत. परंतु , या चार्या अर्धवट सोडल्यामुळे नुकत्याच पडलेल्या पावसाचे पाणी थेट शेतात शिरुन नाडगाव येथील बोदवड शिवारातील गट नं २६७ शेताचे नुकसान झाले आहे. पुलाच्या भरावात मोठ्या प्रमाणात लाल माती तसेच काळी मातीचा वापर होत असुन त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत नागरिकांत चर्चा होती. यातच आता चार्या अपुर्या खोदल्यामुळे बांधाच्या वरुन पावसाचे पाणी थेट शेतात शिरले. पेरलेले पिक वाहुन गेल्यामुळे प्रशांत राणे यांच्या शेताचे नुकसान झाले आहे. संबंधित ठेकेदाराने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.